“मेटा युनिर्व्हसिटी” शिक्षणाची एक नवीन संकल्पना
गेल्या काही दिवसांत समाजाची पुनर्रचना अत्यंत वेगाने होताना दिसत आहे. त्याचे मुख्य कारण आधुनिक तंत्रज्ञानाचा समाज जीवनावर होणारा वाढता प्रभाव होय. आज आधुनिक तंत्रज्ञान जीवनातील सर्वच क्षेत्रात स्थिरावले आहे. त्या तंत्रज्ञानाचा शिक्षणासाठी जास्तीत जास्त फायदा करून घेणे हे आता गरजेचे होणार आहे. आपल्या शिक्षण व्यवस्थेतील खाली नमूद केलेल्या प्रमुख अडचणींवर त्वरीत लक्ष देणे आवश्यक आहे.
१)
शालेय शिक्षणाचा विस्तार वाढला आहे, परंतु त्या शिक्षणाच्या दर्जावर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
२)
प्राथमिक शिक्षण सहज उपलब्ध झाले आहे, पण शिक्षक व विद्यार्थी यांमधील गुणोत्तर फार मोठे झाले आहे.
३)
माध्यमिक शिक्षणाचा विस्तार चांगला होतो आहे, पण येथेही दर्जा व मूल्यमापन पध्दतीवर खूप प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
४)
महाविद्यालयीन शिक्षण हे अजूनही मोजक्या लोकांपर्यंतच पोचले आहे.
५)
विद्यापीठामधून सध्या चांगल्या प्रतीचे शिक्षण देणे व उत्तमता जोपासणे हे एक आव्हान होऊन बसले आहे.
या सर्व अडचणी तर आहेतच पण त्यापेक्षा काही मोठ्या अडचणी ज्या की, शिक्षण व रोजगार, शिक्षण व व्यवसाय आणि शिक्षण व समाजविकास यांचा संबंध जो यायला हवा तसा होताना दिसत नाहीत.
आधुनिक तंत्रज्ञान वापरून शिक्षण क्षेत्रातील या त्रुटी किंवा अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.
मेटा युनिर्व्हसिटी हे त्या दिशेने उचललेले पाऊल आहे, हे नमूद करणे आवश्यक आहे.
मेटा ही संकल्पना पदार्थविज्ञान या विषयातून घेतलेली आहे. मेटॅ म्हणजे उच्च, ही एक अशी प्रणाली आहे कि, जिच्यात एखादा पदार्थ काही काळ उच्च उर्जित अवस्थेत जातो व बराच काळ तेथे स्थिरावतो. तो ऊर्जा देऊन टाकून पुन्हा आपल्या मूळ स्थानावर परत येतो. या प्रणालीला अशी ऊर्जा सतत मिळते. ही संकल्पना मेटा युनिर्व्हसिटी मध्ये शिक्षणासाठी वापरली आहे. ‘A University
of University is Meta University’.
नोव्हेंबर २०११ मध्ये National Innovation Council यांनी मेटा युनिर्व्हसिटी या संकल्पनेचा प्रस्तावर मांडला. National
Knowledge Network उभारीत असलेल्या ‘गिगाबाइट’ (नेटवर्क) जाळ्याचा शिक्षणाचा विस्तार व सर्वांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी उपयोग, असा या संकल्पनेचा मुळ विचार होय.
पुण्यात ऑगस्ट ४ व ५ तारखेला ‘महाराष्ट्र मेटा युनिर्व्हसिटी व न्यू एज्युकेशन’ या विषयावर डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली एक राष्ट्रीय परिसंवाद झाला. त्यामध्ये प्रा. राम ताकवले यांनी महाराष्ट्र मेटा युनिर्व्हसिटी ची संकल्पना मांडली. ती National
Innovative Council ने मांडलेल्या संकल्पनेपेक्षा जास्त व्यापक आहे. प्रा. राम
ताकवले यांनी मांडलेले विचार विस्तृत स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करीत आहे.
महाराष्ट्र मेटा युनिर्व्हसिटी ची वैशिष्ट्ये बघण्याआधी नवीन शिक्षण व त्याची प्रक्रिया समजून घेणे गरजेचे आहे. या नवीन शिक्षण संकल्पनेमध्ये शिक्षण व समाजविकास याची प्रत्यक्ष सांगड, ज्ञान व संपत्ती यांचा परस्पर संबंध, डिजिटायझेशनचा वापर करून नवीन शिक्षण प्रक्रिया आणि संस्कृती यांचा समाजाशी जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या मेटा युनिर्व्हसिटी ची संकल्पना विद्यार्थी व समाजकेंद्री असणार आहे त्यातील प्रमुख वैशिष्ट्ये
खालीलप्रमाणे –
१)
e-Platform – संपूर्ण शिक्षणासाठी यातील सर्व सुविधांचा पुरेपूर वापर केला जाणार आहे.
२)
Open Education Resources
(मुक्त शिक्षण स्त्रोत) – सध्या जगात विकीपिडीयामुळे OER ही संकल्पना खूप प्रचलीत झाली आहे. त्यातच MIT, हावर्डे व इतर विद्यापीठांनी आपल्याकडे उपलब्ध असलेले ज्ञानाचे भांडार सर्वांसाठी मोफत खुले केले आहे. त्यामुळे उच्च दर्जाचे शैक्षणिक साहित्य मोफत उपलब्ध झाल्याने शिक्षणावरील खर्च कमी होणे शक्य झाले आहे.
३)
सोशल एज्युकेशन नेटवर्क – शिक्षक, शिक्षण प्रक्रियेस सहाय्यक व विद्यार्थी यांचा एक सैल किंवा निर्बंध समूह जो Virtual असेल आणि एकामेकांस सहाय्य व परस्पर सहकार्यांवर आधारीत असेल.
४)
शिक्षणाचा दर्जा उंचविण्यासाठी आधुनिक संगणक प्रणालीचा प्रभावी वापर व त्यामुळे वैयक्तिक दर्जा व समूहाचा दर्जा यांमधील योग्य समन्वय आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यांत e-portfolio याचा प्रभावी वापर केला जाणार आहे याचा शिक्षण प्रक्रियेत होणारा विकास व त्याचे मूल्यमापन जास्त योग्य पध्दतीने होणार आहे.
५)
स्वराज्य किंवा स्वनियंत्रण या परस्पर विश्वासावर आधारित शिक्षण व विकास यांची प्रक्रिया यांचा सुयोग्य वापर या प्रणालीत केला जाणार आहे.
प्रत्यक्ष शिक्षण प्रक्रिया –
वरील नमूद केलेल्या वैशिष्ट्याचा शिक्षण प्रक्रियेतील अंर्तभाव करण्यासाठी नवीन शिक्षण प्रक्रियेचा विचार होणे गरजेचे आहे. त्यासाठी लागणारी साधनसामुग्री (Infrastructure)
सुध्दा वेगळी व आधुनिक असायला हवी.
जगात उपलब्ध असलेल्या ज्ञानस्त्रोताचा सुयोग्य वापर व जुन्या प्रणालीतील अनुकरणीय संकल्पनाचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
१)
Distributed
Classroom (वितरीत वर्ग) – एक शिक्षण हजारो विद्यार्थ्यांचा वर्ग एकाचवेळी ह्या प्रणालीमुळे घेऊ शकतो. त्यामुळे चांगल्या व अनुभवी शिक्षकांचा ज्ञानाचा लाभ अनेक विद्यार्थ्यांना उपलब्ध होऊ शकेल.
२)
शैक्षणिक क्रेडीट – विद्यार्थी व विद्यार्थी गटाच्या शिक्षणाचे व त्यांनी केलेल्या कामाचे मूल्यमापन सतत होत राहणार आहे. त्यातील मिळणारे गुणांचे क्रेडीट जमा करण्याची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध विषयांचा अभ्यास करण्याचा आनंद घेता येईल व एकसूरी शिक्षणातून त्यांची मुक्तता होईल.
३)
शिक्षण व समाजविकास यांच्या अंर्तभावामुळे अध्ययन व अध्यापन करणारे यांचा एक स्वतंत्र गट तयार करणे आणि त्यांना पर्सनलाईज लर्निंगच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
४)
पाठ्यक्रमा अनुसार सेवा पुरविणारी (कोर्स टीम तयार करणे) - आपल्या अनुभवाच्या आधारे हि टीम विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करेल. ती प्रत्यक्ष शिकविणार नाही पण शिक्षणास मदत करेल किंवा शिक्षण प्रक्रियेस मदत करेल.
५)
अभ्यास केंद्र गट (Study Center Team) – अभ्यास केंद्र गटाची भूमिकापण खुप मोलाची असणार आहे. ती ही संगणक प्रणाली उपलब्ध करून देईल व कोर्स टीम व विद्यार्थी यांच्यात समन्वय निर्माण करण्याचा प्रयत्न करेल.
६)
शिक्षणाचा दर्जा आणि उत्तमता राखणारे व गुणवत्ता वृध्दींगत करणारी व्यवस्था – संशोधन व विकास (Research & Development) मूल्यमापन (Evaluation) यावर सतत काम करणारा एक समूहगट तयार केला जाणार आहे. या समूहगटात अनुभवी शिक्षकांबरोबर व्यावसायीकांचा पण अंर्तभाव केला जाणार आहे.
महाराष्ट्र मेटा युनिर्व्हसिटीचे एक ठळक वैशिष्ट असे असणार आहे की, ती विद्यार्थींकेंद्रीत असेल आणि इंटरनेटद्वारा तिचे वितरण होत असल्यामुळे खालील नमूद केलेल्या गोष्टीचा लाभ विद्यार्थ्यांना मिळेल.
·
हवे तेव्हा, हवे तिथे शिक्षण उपलब्ध होऊ शकेल.
·
शिक्षणाचा उद्देश समाजविकास असल्यामुळे जगण्यास आवश्यक व जीवनामान उंचविण्यासाठीचे शिक्षण हा आणखी एक प्रमुख उद्देश असणार आहे.
·
विद्यार्थी हा समाजाचा एक भाग आहे व त्याचे शिक्षण ही समाजाच्या साहाय्याने होणारी प्रक्रिया आहे हे मान्य केल्यावर, समाज व विद्यार्थी राहत असलेल्या समूहाचे सहकार्य याच्यावर प्रमुख भर दिला जाणारा आहे.
·
या प्रक्रियेतून विद्यार्थी स्वतःची क्षमता (Capacity) व कार्यकुशलता (Capability) वाढविण्याचे उद्दीष्ठ असणार आहे.
समूहा सोबत काम करणे, गटांतून काम करणे व कामातून शिकत राहणे आणि समाजविकास करणे ही वृत्ती तयार करणे हे या प्रणालीचे वैशिष्ट आहे.
मेटा युनिर्व्हसिटीची कार्यपध्दती –
महाराष्ट्र मेटा युनिर्व्हसिटी ही सध्या कार्यरत असलेल्या महाविद्यालय व विद्यापीठांबरोबर आपले कार्य सुरू करेल त्यांना एकत्र करून त्यांचा एक संयुक्त परिवार तयार करण्याचा प्रयत्न करेल या महाविद्यालयातील व विद्यापीठातील शिक्षकांच्या अनुभवाचे देवाणघेवाण या प्रणालीतून होवू शकेल. हेच शिक्षक अनेक कोर्स टीमचे सदस्य होतील व त्यांनी तयार केलेले कोर्सेस या प्रणालीतून वितरीत होतील. या अनुभवी शिक्षकांसोबतच प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेले कुशल कारागीर, उद्योजक, व्यवस्थापन तज्ञ, व्यावसायातील तज्ञ व निवृत्त शिक्षकांच्या अनुभवाचाही लाभ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी करून देण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांना या अनुभवी तज्ञांच्या व्यतिरिक्त आपल्यापेक्षा अनुभवाने थोडे श्रेष्ठ ( Senior or Most
Knowledgeable Other (MKO) यांच्या अनुभवांच्या टिप्सचा फायदा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठी सातत्यपूर्ण सर्वंकश मूल्यमापन (Continuous
Comprehensive Evaluation) यांचा वापर केला जाणार आहे. शिक्षक व शिक्षण प्रक्रियेचे सहाय्यक (Tutor &
Mentors) हे याप्रकारचे मूल्यमापन करतील या मूल्यमापनातून क्रेडीट जमा होतील.
महाराष्ट्र मेटा युनिर्व्हसिटी व्यवस्थापन –
महाराष्ट्र मेटा युनिर्व्हसिटी चे व्यवस्थापन हे अतिशय वेगळे असणार आहे. स्वतंत्र व स्वयंम नियंत्रण यावर भर असल्यामुळे ही प्रणाली सतत आधुनिक व समाजउपयोगी राहू शकेल. महाराष्ट्र मेटा युनिर्व्हसिटीची संकल्पनेसाठी लवकरच एक (Consortium (सहकारी गट समूह) अस्तित्वात येईल. या Consortium च्या माध्यमातून हा प्रयोग पुढे नेण्याचा विचार आहे.
महात्मा गांधीच्या ‘नई तालीम’ व डॉ. जे.पी. नाईक यांनी शिक्षणाविषयी मांडलेल्या विचारांचा योग्य समन्वय या प्रयोगात करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. हा प्रयोग यशस्वी होण्यासाठी आपल्या सर्वाच्या सहकार्यांची गरज आहे.
No comments:
Post a Comment